Ad will apear here
Next
श्रीसूक्त (ऋग्वेद) - भाग चार


आजच्या लेखात आपण श्रीसूक्तामधील ऋचा क्रमांक दोन आणि तीनचा विचार करणार आहोत. या दोन्ही ऋचा श्रीसूक्तामधील अतिशय महत्त्वाच्या ऋचा मानल्या जातात. श्रीलक्ष्मीच्या अतिशय प्रभावी अशा स्तोत्रांपैकी श्रीसूक्त हे प्रमुख असल्याने ते तर्कशुद्ध, सुस्पष्ट आहे. त्या सूक्तामधील प्रार्थनेचं तंत्रही असंच मोकळं आणि मनस्वी आहे, हे आपल्या लक्षात येईल. या दोन्ही ऋचा पुढीलप्रमाणे आहेत.

तां म आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीम्।
यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानहम् ॥२॥

(हे अग्निदेव, त्या अविनाशी आणि कधीच दूर न जाणाऱ्या अशा श्रीलक्ष्मीचे माझ्यासाठी आवाहन करून तिला बोलवा. जिच्या कृपेने मला धनसंपत्ती, गाय, अश्व (घोडा) आणि सुहृद नातलग, पुरुष (मित्र, नातेवाईक) यांचा लाभ होवो.

अश्वपूर्वां रथमध्यां हस्तिनादप्रबोधिनीम्।
श्रियं देवीमुपह्वये श्रीर्मादेवीर्जुषताम्॥३॥

(जिच्या मिरवणुकीत घोडे, मध्यभागी रथ असून, ती ज्या हत्तीवर आरूढ झालेली आहे, अशा हत्तींच्या चित्कारयुक्त ललकाऱ्यांनी जी सदैव जागृत राहते, अशा श्रीलक्ष्मीला मी माझ्यासाठी आवाहन करतो आहे. तिची कृपा सदैव मजवर असू दे.)

श्रीसूक्तातील १६ ऋचांपैकी प्रत्येक ऋचा ही मंत्रस्वरूपही आहे हे आपल्या लक्षात येईल. ‘आर्तता’ (आळवणी) हे श्रीसूक्ताचे वैशिष्ट्य आहे, असं मला नेहमी वाटतं. जन्म घेतल्यापासून मनुष्य हा आनंदासाठी आणि सुखासाठी धडपडत असतो. आनंद हा अनाहत ध्वनीसारखा असतो. तो स्वयंभू आणि सर्वोपलब्ध असतो. म्हणजे आनंदी कोणीही असू शकतं. एखादा कोट्यधीश आनंदी असेल, तसाच एखाद्या विशिष्ट प्रसंगाने रस्त्यावर भीक मागणारा एखादा भिकारीही आनंदी असू शकतो. आनंद हा तुमच्या आर्थिक परिस्थितीवर अवलंबून नाही. एखादा आजाराने जराजर्जर झालेला मनुष्यही त्याच्या प्रियजनांना बघून आनंदी होऊ शकतो. आनंद हा नैसर्गिक आणि स्वयंप्रेरित आहे यात शंकाच नाही; पण सुखाचं तसं नाही. सुख आणि आनंद यात फरक आहे. सुखाची साधने ही प्राप्त करून घ्यावी लागतात. त्या साधनांच्या प्राप्तीसाठी धडपड करावी लागते. प्रयत्न करावे लागतात. तेव्हा ती साधने व त्यातून सुख प्राप्त होते. शांत झोप यावी म्हणून आपण बेडरूममध्ये एक सुखकर, कम्फर्टेबल बेड खरेदी करतो. वातानुकुलन यंत्र (एअर कंडिशनर) बसवतो. ही सुखाची साधने खरेदी करून आपण झोप या आनंदाची प्रतीक्षा करतो. प्रचंड मानसिक तणाव किंवा एखादे वेदनामय आजारपण नसेल, तर अर्थातच या सुखाच्या साधनांनी अतिशय सुंदर आणि गाढ झोप लागणारच हे नक्की आहे यात शंकाच नाही. आणि म्हणूनच अनादि कालापासून मनुष्य या सुखाच्या साधनांचा शोध घेत आहे. या दोन्ही ऋचांमध्ये आपल्या मागण्यांना सुरुवात झालेली आहे, असं दिसून येईल.

आजच्या लेखातील ऋचा क्रमांक दोनमध्ये सूक्तकर्ता हा अग्नीला आवाहन करतो आहे, की अशा श्रीलक्ष्मीला माझ्याकडे माझ्यासाठी येण्याचे आवाहन कर, की जी चंचल नाही, स्थिर आहे आणि भगवान विष्णूंचे ठायी ती ज्या पद्धतीने स्थिर आहे, तशीच ती माझ्याकडेही अचल व स्थिर राहावी, जेणेकरून मला पशुधन म्हणजे गायी-घोडे यांची प्राप्ती होईल व धनसंपत्तीही मिळेल. त्याचप्रमाणे मला मदतगार ठरतील असे मित्र, नातेवाईक व सुहृदांचाही लाभ तिच्या कृपेने होईल. 

श्रीसूक्तातील या ऋचेत आपल्या एक गोष्ट ध्यानात येईल, की इथे अग्नी (Fire) हा मध्यस्थाची भूमिका बजावतो आहे. अग्नी हे देवतांचे मुख मानले जाते. त्यामुळे आपल्या हिंदू धर्मात हवन/यज्ञाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. अग्नीला आहुती दिली, की त्या हविर्द्रव्यांची प्राप्ती संबंधित देवतेला होते अशी श्रद्धा आहे. त्यामुळे महत्त्वाच्या पूजेच्या प्रसंगी हवन करण्याची पद्धत आहे.

आजच्या लेखातील ऋचा क्रमांक तीनमध्ये लक्ष्मीच्या आगमनाचे वर्णन केले आहे. इथे आपणास एक गोष्ट नमूद करावीशी वाटते आहे, की Visualizationची पद्धत ही अतिशय आधुनिक पद्धत मानली जाते. म्हणजे The Secret सारख्या पुस्तकांमधून ही पद्धत आत्ताआत्ता पाश्चात्य जगतात रूढ झाली आहे; पण वेदकालापासून आपल्या संस्कृतीत ही पद्धत रूढ होती. यावरून आपलं भारतीय संस्कृतीचं ज्ञान हे किती प्राचीन आहे याची कल्पना येईल. 

इथे अग्निदेवाला आवाहन केल्यानंतर जणूकाही श्रीलक्ष्मीचं प्रस्थान निघालेलं असून, ते आपल्या घराकडेच येत आहे असं मानले आहे. ती ज्या थाटामाटाने मिरवणुकीने निघालेली आहे, त्याचं वर्णन सूक्तकर्ता हा असं करतो, की तिच्या मिरवणुकीच्या सुरुवातीला अश्वांचा ताफा असून, मिरवणुकीच्या मध्ये तिचा श्रीमंत रथ आहे. ती स्वत: गजारूढ (गजान्तलक्ष्मी असे अपेक्षित असावं) असून त्या हत्तीच्या आनंदयुक्त चित्कारांनी ती सचेत आहे, अशा लक्ष्मीचे आगमन माझ्या निवासस्थानी होवो आणि तिची कृपा सदैव मजवर राहो, असं या ऋचेत म्हटलं आहे.

(क्रमश:)

- सचिन मधुकर परांजपे (पालघर)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GYOYCO
Similar Posts
श्रीसूक्त (ऋग्वेद) - भाग तीन नमस्कार, आजपासून आपण मुख्य विवेचनास सुरुवात करू या. एका भागात एक किंवा दोन ऋचांचा समावेश करून, त्यावर विवेचन देऊन आपण श्रीसूक्त विवेचन पूर्ण करू या, असा माझा मानस आहे. शेवटच्या भागात मी पूर्ण श्रीसूक्त देईन. प्रत्येक ऋचेचा अर्थ जर आपणास नीट समजला, तरच श्रीसूक्त पठणास अर्थ आहे. ऋचेचा अर्थ नीट समजून तो
श्रीसूक्त (ऋग्वेद) - भाग पाच लेखमालेच्या पाचव्या भागात आपण श्रीसूक्तातील ऋचा क्रमांक चार आणि पाच अभ्यासणार आहोत. श्रीसूक्त जसंजसं पुढे सरकत जातं, तसंतसं ते अधिकाधिक परिपक्व आणि स्तुती या अर्थाने परिपूर्ण होत जातं, असं आपल्या ध्यानात येईल. अगोदर आपण ऋचा आणि अर्थ बघून घेऊ या.
श्रीसूक्त (ऋग्वेद) - भाग सहा लेखमालेच्या सहाव्या भागात आज आपण ऋचा क्रमांक सहा व सात यांचा अभ्यास करणार आहोत. मी मागेच सांगितल्याप्रमाणे श्रीसूक्त हे ऋग्वेदातील एक अतिशय प्रभावी सूक्त असून ते स्तुतिपर आहे. श्रीसूक्ताची प्रत्येक ऋचा ही मंत्रमय आहे असं म्हटलं, तरी ती अतिशयोक्ती होणार नाही हे सत्य आहे.
श्रीसूक्त (ऋग्वेद) - भाग सात आजच्या भागात आपण श्रीसूक्तातील ऋचा क्रमांक आठ आणि नऊ अभ्यासणार आहोत. या ऋचा पुढीलप्रमाणे आहेत.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language